Don yachak | Kusumagraj | Marathi Kavita

Kusumagraj – Vishnu Vaman Shirwadkar.
(Born: 27 February 1912, Died: 10 March 1999)

दोन याचक

मलीन खाकी गणवेषातिल, सैनिक तरणाताठा कोणी
नाव? कशाचे नाममात्र ते बाहुवरची बघा निशाणी

शरीर विकुनी पोटासाठी एक थेंब हा सरितेसंगे
प्रवाह नेई तिकडे जाई धावत वाहत मरणामागे

मैदानावर पुढे छावणी फुगीर डेरे अवतीभवती
कबुतरांचा जणू थवा हा थकून बैसे जमिनीवरती

त्या गर्दीच्या सीमेवर हा तरूतळी बसला एकाकी
गर्द सावली, गाढ शांतता, वाराही पद हळुच टाकी

दुर्लभ वेळा असते असली ऐकत होता संथ पडोनी
खाकीखाली धडधडणाऱ्या व्यक्तित्वाची करूण कहाणी

कुणी भिकारीण आली तेथे, नाव? कशाचे नाममात्र ते
होते नवथर त्या नवतीला झाकाया नच वस्त्रही पुरते

कळकट चोळीच्या चिंधीतून स्तन डोकावत उंच सावळे
तलम अनावृत दिसे कातडी लाचारीचे विशाल डोळे

उभी राहिली समोर त्याच्या उपसत कंठामधुनि ताना
बोलपटातील परिचित गीते, म्हणे अखेरीस काही द्या ना

काही द्या ना जीभ न केवळ शरीर अवघे होते मागत
ते डोळे, ते स्तन, ती मांडी, सारे उदरास्तव आक्रोशत

शूर शिपाई किंचित बुजला संकोचाची छटा मुखावर
खिशात गेले हात परंतु, नजरेतुन ओसंडे काहुर

त्यासही होते हवे काहीसे, कसे तरी ते कळवे; कळले
दुनियेपासून तुटलेले ते, दोन अनामिक जवळी आले

दूर जरा दरडीच्या खाली मच्छरदाणी करिती पर्णे
नीरवतेवर मुद्रित झाले विविध भुकांचे एकच गाणे, एकच नाणे!

__कुसुमाग्रज [by Kusumagraj]
[कुसुमाग्रजांची ही कविता त्यांच्या इतर कवितांइतकी जरी गाजलेली नसली, तरी त्यांच्यासारखीच अव्वल दर्जाची आहे, यात शंका नाही. एका घटनेचे, त्यांनी या कवितेतून अगदी साध्या आणि ओघवत्या भाषेत चित्रदर्शी वर्णन केले आहे. पोटासाठी वेगवेगळ्या प्रकारे शरीर विकणारे आणि जगाच्या खिजगणतीतही नसणारे भिकारीण आणि सैनिक असे दोन अनामिक जीव एकत्र येतात आणि आपापल्या भुका शांत करतात. दोन्हीमध्ये अनैतिक असे काहीच नाही, असेलच तर ती आदिम काळापासून सोबत करणारी भूक – शरीराची किंवा पोटाची.]

What do you think?

6 points
Upvote Downvote

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Dosh Asati Jagatat kiti yache | Tryambak Bapuji Thombre [Balkavi] | Marathi Kavita

Prem | Kusumagraj | Marathi Kavita