Undarachi Topi | Stories in Marathi | उंदराची टोपी

Marathi Goshti

एक होता उंदीर. तो एकदा फिरायला निघाला. त्याला सापडले एक फडके. उंदराला वाटले आपण याची एक छानशी टोपी शिवावी. अगदी राजाच्या टोपीसारखी. मग उंदीर फडके घेऊन धोब्याकडे गेला आणि धोब्याला म्हणाला, “धोबीदादा, धोबीदादा, एवढे फडके धुऊन देता का? धोबी म्हणाला, “कसले फडके? मला कोठे आहे वेळ?” उंदीर म्हणाला, “असे काय? इतके कपडे धुता. त्यात माझे एवढेसे तर फडके. ते धुवायला वेळ नाही म्हणता. थांबा, मी चार उंदीर आणतो आणि तुमची चांगलीच खोड मोडतो.” धोबी घाबरला. तो म्हणाला, “बरे बाबा, आण इकडे तुझे फडके.” मग धोब्याने फडके धुऊन दिले.

फडके घेऊन उंदीर गेला शिंप्याकडे. उंदीर शिंप्याला म्हणाला, “शिंपीदादा शिंपीदादा, हे फडके घ्या आणि छान टोपी शिवून द्या, अगदी राजाच्या टोपीसारखी.” शिंपी म्हणाला, “कसली टोपी? मला कोठे आहे वेळ?’ उंदीर म्हणाला, “असे काय? इतके कपडे शिवता. त्यात माझी एवढीशी तर टोपी. ती शिवायला वेळ नाही म्हणता थांबा. मी चार उंदीर आणतो आणि तुमची चांगलीच खोड मोडतो.” शिंपी घाबरला. तो म्हणाला, “बरे बाबा, आण इकडे तुझे फडके.” मग शिंप्याने उंदराला छान टोपी शिवून दिली.

टोपी घेऊन उंदीर गेला गोंडेवाल्याकडे. उंदीर गोंडेवाल्याला म्हणाला, “गोंडेवालेदादा, गोंडेवालेदादा, ही टोपी घ्या आणि छान छान गोंडे लावून द्या.” गोंडेवाला म्हणाला, “कसले गोंडे? मला कोठे आहे वेळ?” उंदीर म्हणाला, ..असे काय? इतके गोंडे लावता. त्यात माझ्या टोपीला चार गोंडे लावायला वेळ नाही म्हणता थांबा. मी चार उंदीर आणतो आणि तुमची चांगलीच खोड मोडतो.” गोंडेवाला घाबरला. तो म्हणाला, “बरे बाबा, आण इकडे तुझी टोपी.” मग गोंडेवाल्याने टोपीला गोंडे लावून दिले.

उंदीर टोपी घालून राजा कडे गेला. राजा दरबारात बसला होता. उंदराने राजाच्या टोपीकडे पाहिले. पण राजाच्या टोपीला गोंडे नव्हते, उंदराला हे पाहून आनंद झाला. मग तो आनंदाने गाणे म्हणू लागला.

छान ! छान ! छान ! राजाच्या टोपीपेक्षा माझी टोपी छान !

उंदराची ही बडबड राजाने ऐकली. राजा म्हणाला, “शिपाई, आणा ती उंदराची टोपी काढून !” शिपायाने ताबडतोब उंदराची टोपी काढून घेतली व राजाला नेऊन दिली. उंदराला राजाचा राग आला. तो पुन्हा गाणे म्हणू लागला.

राजा भिकारी, माझी टोपी घेतली ! उंदराची ही बडबड ऐकून राजाने टोपी उंदराच्या अंगावर भिरकावून दिली. उंदराने टोपी घेतली, डोक्यावर घातली व तो आनंदाने गाणे गाऊ लागला. “राजा मला भ्याला, माझी टोपी दिली !’‘ असे गाणे गात-गात उंदीर निघून गेला.

What do you think?

12 points
Upvote Downvote
Tiring Tiring Lyrics from Hostel Days - Guru Thakur Songs

Tiring Tiring Lyrics from Hostel Days – Guru Thakur Songs

Chala Hawa Yeu Dya Lyrics | Zee Marathi | चला हवा येऊ द्या

Chala Hawa Yeu Dya Lyrics | Zee Marathi | चला हवा येऊ द्या