Ganapati Aarti in Marathi | श्री गणपति आरती संग्रह | Ganesh Aarti

गणपती ‘बुद्धी, विघ्ने, शुभारंभ’ इत्यादींची अधिपती देवता. गणपतीचे वाहन उंदीर. शस्त्र पाश, अंकुश, परशु आणि दंत. वडील शंकर, आई पार्वती, पत्नी – ऋद्धी, सिद्धी.

अन्य नावे: ब्रह्मणस्पती, मयुरेश्वर, लंबोदर, वक्रतुंड, विनायक, विघ्नेश्वर, विघ्नहर, शूर्पकर्ण

गणपतीची बारा नावे:
१) वक्रतुंड २) एकदंत ३) कृष्णपिंगाक्ष
४) गजवक्त्र ५) लंबोदर ६) विकट
७) विघ्नराजेंद्र ८) धूम्रवर्ण ९) भालचंद्र
१०) विनायक ११) गणपती १२) गजानन

मंत्र: ॐ गं गणपतये नमः

तीर्थक्षेत्रे अष्टविनायक: मोरगाव, थेऊर, रांजणगाव, ओझर, लेण्याद्री, महड, पाली व सिद्धटेक या ठिकाणी ‘अष्टविनायक स्थाने’ आहेत.

गणेश शब्दाचा अर्थ गणांचा ईश वा प्रभू असा आहे. गण म्हणजे शिव व पार्वतीचे सेवक होय. गणांचा अधिपति म्हणून गणपती असेही नाव या देवतेस आहे. प्रसन्न व मंगल मूर्ती असलेला श्रीगणेश विघ्नांचे हरण करतो, म्हणून या गणपतीला विघ्नेश्र्वर म्हणतात.

सुखकर्ता दुःखकर्ता चे रचनाकार रामदास आहेत.

गणेश जयंतीला गणपतीची स्थापना केल्यानंतर मूर्तीसमोर सकाळ -संध्याकाळ आरत्या म्हणायची पद्धत आहे. सुखकर्ता दुखकर्ता ही आरती झाल्यावर प्रथम दुर्गेची, नंतर शंकराची आणि त्यानंतर वाटल्यास इतर आरत्या म्हणतात. आणि शेवटी ‘घालीन लोटांगण….’

घालीन लोटांगण’ हे कॉकटेल काव्य आहे, ह्यातली पाच कडवी कुठल्या तरी भक्ताने इथून तिथून जमवून त्यांचे मिश्रण केले आहे. घालीन लोटांगण प्रार्थना गणपतीसमोर म्हणतात, त्यातले एकही कडवे गणपतीला उद्देशून नाही.

१) पहिले कडवे ‘घालीन लोटांगण’ हे संत नामदेवांचे आहे.

२) दुसरे कडवे ‘त्वमेव माता च पिता त्वमेव’ हे गणपती किंवा कुठल्या देवाला उद्देशून नसून तो गुरुस्तोत्राचा भाग आहे. शंकराचार्यांनी जे श्रीगुरुस्तोत्र लिहिले, त्यात ‘गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु’ श्लोक समाविष्ट आहे.

३) तिसरे कडवे ‘कायेन वाचा’ हे श्रीमद्भागवतपुराणातले आहे. एकूण अठरा पुराणांपैकी हे एक, व्यासांनी लिहिलेले पुराण आहे. ‘कायेन वाचा’ हा श्लोक स्कंध ११, अध्याय २ ह्यामध्ये ३६ वा श्लोक आहे.

४) चौथे कडवे ‘अच्युतम् केशवम्’ हे ‘अच्युताष्टकम्’ ह्या शंकराचार्यांच्या काव्यातून घेतले आहे. काव्याचे नाव ‘अच्युताष्टकम्’ असून त्यात आठ आणि फलश्रुतीचा एक असे नऊ श्लोक आहेत.

५) पाचवे आणि शेवटचे कडवे ‘हरे राम हरे राम’ हे ‘कलिसन्तरण’ ह्या उपनिषदातले आहे. ह्या उपनिषदाची सुरुवात ‘ॐ सह नाववतु । सह नौ भुनक्तु । सह वीर्यम् करवावहै । तेजस्विनावधीतमस्तु । मा विद्विषावहै । ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः ।’ अशी आहे.

मराठी संस्कृतीत ठायीठायी असणार्‍या गणपतीचा उत्सव सार्वजनिक करून लोकमान्य टिळकांनी गणेशाचे महाराष्ट्राच्या लोकजीवनातील महत्त्व अधोरेखित केले.

Reference from Wikipedia