अशी ही थट्टा – संत एकनाथ अभंगवाणी Lyrics in Marathi
बरी नव्हे थट्टा, बरी नव्हे थट्टा, बरी नव्हे थट्टा
भल्याभल्यास लाविला बट्टा, अशी ही थट्टा
ब्रह्मदेव त्रैलोक्याला शोधी
थट्टेने हरवली बुद्धी
केली नारदाची नारदी
अशी ही थट्टा
थट्टा दुर्योधनानं हो केली
पांचाळी सभेत गांजिली
गदाघावे मांडी फोडिली
अशी ही थट्टा
थट्टेने दुर्योधन मेला
भस्मासुर भस्म की हो झाला
वालीही मुकला प्राणाला
अशी ही थट्टा
थट्टा रावणाने त्या केली
सोन्याची लंका बुडविली
थट्टा ज्याची त्यास भोवली
बरी नव्हे थट्टा
थट्टेतून सुटले चौघेजण
शुक भीष्म आणि हनुमान
चौथा कार्तिकस्वामी जाण
त्याला नाही बट्टा
एका जनार्दनीं सर्वांला
थट्टेला भिऊन तुम्ही चाला
नाहीं तर नरककुंडाला
अशी ही थट्टा