आला रे आला फेरीवाला – AALA RE AAL FERIWALA Lyrics
आला रे आला, आला आला फेरीवाला
भवती बालगोपालांचा मेळा जमला
फेरीवाल्या, फेरीवाल्या, गाडीत काय? तुझ्या गाडीत काय?
तुझ्या गाडीत खेळणी काय काय?
सांगू?
हो, हो, सांग.. सांग..
लाकडाचा काऊ आहे, रबराची माऊ आहे
मातीचा आऊ आहे, प्लॅस्टिकची चिऊ आहे
राणी आहे, राजा आहे, फूं फूं वाजे बाजा आहे
चेंडू आहे, शिट्टी आहे, दांडू आहे, विट्टी आहे
देऊ तुम्हाला काय यातले लौकर आता बोला?
नको, नको रे फेरीवाल्या, अशी खेळणी आम्हांला
आला रे आला, आला आला फेरीवाला
फेरीवाल्या, फेरीवाल्या, आणखीन काय? तुझ्या गाडीत काय?
तुझ्या गाडीत आणखी काय काय?
सांगू?
हो, हो, सांग.. सांग..
मगर आहे, सुसर आहे, हरीण, वाघ, डुक्कर आहे
प्राणी आहे, पक्षी आहे, फुलवेलींची नक्षी आहे
गाडी आहे, घोडा आहे, नवरा-नवरी जोडा आहे
रेल्वे, मोटार, ट्रॅम आहे, इलेक्ट्रीकचा खांब आहे
शहाजहानचा ताज आहे, संसाराचा साज आहे
देऊ तुम्हाला काय यातले लौकर आता बोला?
नको, नको रे फेरीवाल्या, अशी खेळणी आम्हांला
आला रे आला, आला आला फेरीवाला
फेरीवाल्या, फेरीवाल्या, आणखीन काय? तुझ्या गाडीत काय?
तुझ्या गाडीत आणखी काय काय?
सांगू?
हो, हो, सांग.. सांग..
हाती धरुनिया तलवार, झाला घोड्यावरती स्वार
ज्याचे देशप्रेम अनिवार, ज्याचा राष्ट्राला आधार
नच गेला कोणा हार, जो स्वप्नं करी साकार
त्या शिवबाच्या मूर्ती माझियापाशी.. सांगा, काय तुम्ही घेणार?
आम्ही मूर्ती तुझ्या घेणार, आम्ही मूर्ती तुझ्या घेणार
शिवरायाला रोज स्मरोनी आम्ही देखिल देशभक्त होणार
तुमची आवड पाहुन बालांनो मज हर्ष मनी झाला
एक, एक दे शिवरायाची मूर्ती आम्हां सर्वांला
आला रे आला, आला आला फेरीवाला